जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडे येत असतांना पाळधी गावापुढे तरुणाचा भीषण अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संदीप नवल जाधव (वय ३९,रा.पिप्राळा हुडको) असे जखमीचे नाव आहे. तो व्यवसायानिमित्त पाळधीकडे गेला होता. तेथून काम आटोपून जळगावकडे परत येत असताना विद्यापीठाच्या अलीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर त्याचा अपघात झाला. तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अपघाताविषयी माहिती मिळाली नाही.
नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याच्या चेहऱ्याला उजव्या बाजूला जबर मार लागला असून उजव्या पायाला मुक्कामार लागला आहे. वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केले. अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.