सुरत येथून परतताना विसरवाडी जवळ झाला
भीषण अपघात
जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, गोसेवक नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांचे गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० सुरत येथून जळगाव येथे परतत असतांना नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी तालुक्यातील पानबारा येथे ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला. उपचारादरम्यान त्यांचा नंदुरबार येथे मृत्यू झाला आहे. यामुळे जळगावच्या धार्मिक, सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
याबाबत नवापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सुरत येथून कामकाज आटोपून मित्रांसह जळगावला येण्यासाठी दुपारी निघाले होते. दरम्यान संध्याकाळी ५. ३० वाजता त्यांचे चारचाकी वाहन एम.एच. १९, सी.व्ही. ६३१० हे नंदुरबार जिल्ह्यात विसरवाडी तालुक्यात पानबारा येथे आली असतांना ट्रक क्रमांक (सी.जी. ०४, एच, वाय. ७०२५) याने डाव्या बाजूने नरेश खंडेलवाल यांच्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात कारमध्ये बसलेले नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल (वय-६५) , त्यांचे मित्र विजय जैन, चालक संजय व त्याचा एक मित्र हे जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी नंदुरबार येथे आणण्यात आले.
यात नरेश खंडेलवाल यांची प्रकृती गंभीर झाली असल्याने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र, उपचार दरम्यान काही वेळाने त्यांचे दुःखद निधन झाले. तसेच इतर तिघे किरकोळ जखमी असल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान नवापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील माहिती घेत आहे.
कोण होते नरेश खंडेलवाल ?
नरेश खंडेलवाल यांची भारतीय नरेंद्र मोदी संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. भारतीय संस्कृती संवर्धन, राष्ट्रनिर्माण यांचा त्यांनी सातत्याने प्रचार केला. खंडेलवाल यांचे समाजसेवा, हिंदू धर्मसेवा तसेच गोरक्षण क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. अनाथ मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्नी त्यांनी ३२ हजार स्क्वेअर फूट जागा विद्यापीठाजवळ उपलब्ध करून दिली होती. समाजसेवेसाठी त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.