विद्यार्थिनींनी सादर केली सत्यकथा
जळगाव (प्रतिनिधी):=जागतिक महिला दिनानिमित्त एम. जे. महाविद्यालय, मुलींचे वसतिगृहात, “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी संविधान सभेतील १५ महिलांच्या योगदानाच्या प्रेरणादायी कहाण्या आणि संविधान सभेत महिलांच्या अधिकारांसाठी केलेला संघर्ष खूप छान पद्धतीने मांडला.

त्याकाळी “घरी कधी परत येणार?” हा प्रश्न विचारायचा नाही ही अट नवऱ्याला घालणाऱ्या अम्मू स्वामीनाथन यांची भूमिका नेहा मोरेने केली. संविधानाच्या लिखित प्रतवर स्वाक्षरी करणाऱ्या हंसा मेहता यांची भूमिका अंजली अंदोरेने केली. सामाजिक रचना बदलण्याची साधनं संविधान देतं हे सांगणाऱ्या पूर्णिमा बॅनर्जी यांची भूमिका हेमलता महाजनने केली. वडिलांच्या संपत्तीत मुलीचाही हक्क पाहिजे आणि ते काही पाश्चात्य संकल्पना नाही हे सांगणाऱ्या कमला चौधरी यांची भूमिका प्रेरणा चौधरीने केली. बालविवाह ते संविधान सभा प्रवास करणाऱ्या आणि संविधान सभेत ७५० दुरुस्त्या सुचवणाऱ्या दुर्गाबाई देशमुख यांची भूमिका प्रियंका अहिरेने केली.
फाळणीवेळी नौआखालीच्या दंगलीत ४०० महिलांची सुटका करणाऱ्या आणि संविधान सभेत महिलांच्या हक्काची बाजू मांडणाऱ्या लीला रॉय यांची भूमिका बाली राठोडने केली. जगात महिलांना मोठ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वात फार कमी संधी मिळत असताना, १९२५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू निवडल्या जातात आणि संविधानातील स्त्री-पुरुष समानतेचे बीज आपल्याला कळते. त्यांची भूमिका स्नेहल महाजनने केली. ग्रामविकासासाठी प्रौढ शिक्षण महत्त्वाचे आहे हे सांगणाऱ्या मालती चौधरी यांची भूमिका वैष्णवी माळीने केली. भारत देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांची भूमिका नेहा हिरोळेने केली.
समुद्राला जात नसते आणि माणसालाही जात नसावी हे सांगणाऱ्या व या देशात एकही अस्पृश्य व्यक्ती रहायला नको हे सांगणाऱ्या दाक्षायणी वेलायुधन यांची भूमिका कांचन कऱ्हाडेने केली. संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने ठाम उभ्या राहणाऱ्या बेगम ऐझाझ रसूल यांची भूमिका रागिनी सोनवणेने केली. हिंदू कोड बिलाच्या कट्टर समर्थक एनी मास्कारेन यांची भूमिका प्रियंका चौधरीने तर विजयालक्ष्मी पंडित यांची भूमिका क्रिती पाटीलने व रेणुका रे यांची भूमिका रोशनी मोरेने केली.आपल्या देशाच्या पहिल्या महिला स्वास्थ्य मंत्री अमृत कौर यांची भूमिका जान्हवी इंगळेने केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसतिगृहाचे प्रमुख संजीव पाटील आणि संध्या संजीव पाटील यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘संविधान जागर अभियान’ सदस्य श्रध्दा रेखा राजेंद्र आणि सुश्मिता भालेराव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा मोरे यांनी केले तर प्रस्तावना अंजली अंदोरे यांनी मांडली. संजीव पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले व मुलींना मार्गदर्शन करत, मतदानाचा अधिकार, आर्थिक स्वावलंबन याचे महत्त्व मुलींना पटवून दिले.
श्रध्दा रेखा राजेंद्र यांनी वसतिगृहातील मुलींना, पूर्वीच्या काळातील स्त्रियांची व्यथा आणि संघर्ष सांगितला आणि या आजही खऱ्या अर्थाने समाजात समानता आणण्यासाठी जनजागृती करण्याचे महत्त्व सांगितले. सुश्मिता भालेराव यांनी आजच्या तरुणाईला जागृत राहण्याची आवश्यकता आहे याबाबत मत मांडले. या सर्व मुलींनी मिळून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा वसतिगृहाला भेटस्वरुप दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणा चौधरी यांच्याद्वारे महिलांना शपथ देण्यात आली आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाचा समारोप प्रियंका अहिरे यांनी केला.









