बीड ( प्रतिनिधी ) – लातूर-औरंगाबाद एसटी बसला ट्रक धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला व आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बस अपघाताची ही घटना घडली.
जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूर-औरंगाबाद बस लातूरहून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्यानजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे लगेच समजू शकले नाही मात्र या अपघाताची तीव्रता इतकी होती, की सहा जणांना जागीच प्राण गमवावे लागले.
लातूर औरंगाबाद बस ( क्रं. एमएच 20 , बीएल 3017 ) लातूर येथून निघाली होती बसचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाल्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मालमोटारीचा समोरील भाग एसटी बस मध्ये घुसल्याने बस एका बाजूने कापली गेली होती. सकाळच्या सुमारास दाट धुके होते. त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.मयत आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.