अमळनेर (प्रतिनिधी) – सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी वरचढ असलेली भाजपला आता उतरती कळा लागली असून मुक्ताईनगर आणि जळगावच्या नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली असताना आता अमळनेर तालुक्यातील महिला नेत्या पुन्हा आपल्या स्वगृही अर्थात काँग्रेस पक्षात जाण्याच्या तयारीत असून येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोरोना काळात आता भाजपला अनेकांनी राम राम करायला सुरुवात केली असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यापासून सुरू झालेले पक्षांतर खालच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्येही सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे . मुक्ताईनगर पालिकेच्या नगरसेवकांसह जळगाव मनपाच्या काही भाजप नगरसेवकांनी सेनेची वाट धरली आहे. आता अमळनेरमध्ये भाजपच्या काही नाराज गटामध्येही धुसफूस सुरू असल्याने महिला पदाधिकारी असलेल्या नेत्या भाजपला राम राम ठोकून काँग्रेस प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवशी करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याला वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे अमळनेर येथेही भाजपला खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे