जळगाव ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती करणारा व त्याला गुन्ह्यात मदत करणारा त्याचा साथीदार अशा दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
अटकेतील दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. तुषार पुरुषोत्तम पवार (19 , कसबे वणी ता. दिंडोरी जि. नाशिक) व सचिन संजय मराडे (23 , खंबाळे ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक ) अशी या आरोपींची नावे आहेत.
19 जुलै रोजी दुपारच्या वेळी शहरातील एका अल्पवयीन मुलीस तुषार पवार याने पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या कामी तुषार यास त्याचा मित्र सचिन मराडे याने मदत करुन गुन्ह्यास प्रोत्साहन दिले.
सुरुवातीला एमआयडीसी पोलिस स्टेशनला पीडितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पीडितेवर अत्याचार व त्यातून ती गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम (4), (5), (एल), (6), 17 आदी कलम वाढवण्यात आले. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील पो.उ.नि. रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, मुकेश पाटील, तुषार गिरासे आदींनी तपासात परिश्रम घेतले. अटकेतील आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.