खा. सुप्रिया सुळेंकडून निषेध
पुणे (प्रतिनिधी) – आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना सोहळ्याला गालबोट लावणारी घटना रविवारी ११ रोजी घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात झटापटी देखील झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप करून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचा निषेध केला आहे.
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकरी मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले होते.
गेल्यावर्षी झालेली गर्दी लक्षात घेता, फक्त ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जात होता, पण वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनी मंदिरात बंदोबस्त वाढविला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.