अखेर जळगावला मिळाले निवासी उपजिल्हाधिकारी, सोपान कासार यांची नियुक्ती !
राज्य शासनाच्या महसूल विभागाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) या महत्वाच्या पदावर राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने वर्धा येथील भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी पारित झाले.
महसूल व वन विभागाने अनेक अधिकाऱ्यांच्या मंगळवारी प्रशासकीय कारणास्तव पदस्थापनेने बदल्या केल्या. यामध्ये महाराष्ट्रातील काही रिक्त पदे भरली गेली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून राहुल पाटील यांची चार महिन्यांपूर्वी अहमदनगर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी मात्र प्रभारी अधिकारी कामकाज पाहत होते. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी शासनाने कोणाचीही नियुक्ती केली नव्हती.
अखेर मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी महसूल व वन विभागाने अनेक अधिकाऱ्यांचे आदेश पारित केले. त्यात वर्धा जिल्ह्यातील भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची नियुक्ती जळगाव येथे आरडीसी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त जागेचा प्रश्न सुटला आहे.