जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव कार आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये घुसून झालेल्या अपघातप्रकरणी कारचालक दीपक कृष्णा सोनार (३४, रा. भुसावळ) याच्याविरुद्ध मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक मालमत्ता व वाहनाचे नुकसान, दारुच्या नशेत वाहन चालविणे व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील दीपक कृष्णा सोनार (३४) व त्यांचे मित्र सुरजसिंग दिनेशसिंग राजपूत (२९, सुरत) हे कारने (क्र. एमएच १९, डीवाय ८८५९) जळगावकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात त्यांची भरधाव कार थेट सर्कलमध्ये चढली. या घटनेत सर्कलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही महिन्यांपूर्वीच बसविलेला सिग्नलचा खांबही कारच्या धडकेत कोसळला आहे. या ठिकाणी रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे दोघांची विचारपूस करीत असता दीपक सोनार याने उर्मटपणे उत्तरे देत अरेरावी केली होती. पोहेकों चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (४ फेब्रुवारी) रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली.
या प्रकरणी जंडू कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांनी रामानंद पोलिस ठाण्यात केवळ पत्र दिले. मात्र फिर्याद दिली नाही. हेकॉ चंद्रकांत पाटील यांचे फिर्यादीवरून दीपक सोनार याच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता व वाहनाचे नुकसान, दारुच्या नशेत, भरधाव व धोकादायकरित्या वाहन चालविणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती मिळाली.