संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविक तल्लीन
जळगाव (प्रतिनिधी) :- ज्या आई-वडिलांनी आपला सांभाळ केला, आपल्याला समाजात राहण्यायोग्य बनविले. त्यांना वृद्धापकाळात सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असा भावार्थ कथा व्यास ह.भ.प. डॉ. विशाल शास्त्री गुरुबा यांनी केला.
येथील तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावात मनपा शाळा क्रमांक ३, पांजरपोळ येथे २५ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत श्रीमद् भागवत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी कथा व्यास ह.भ.प. डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांच्या वाणीतून भाविकांना कथा श्रवण केली.
आईच्या मारण्यातही संस्कार
काही चुकी झाल्यास मुलांना पालकांनी मारू नका, मात्र आईच्या मार खाण्यामध्येदेखील एक प्रकारचा संस्कार असतो, असे ह.भ.प. डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी सांगून पुढे म्हणाले, कलियुगात सत्य, संस्कारी माणसाला आयुष्य कमी असते. येथे औरंगजेब १०० वर्षे जगतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ५० वर्षे जगतात. ज्याप्रमाणे मंदिरात जाऊन आपण प्रदक्षिणा मारतो, त्याप्रमाणे स्वतःलाही प्रदर्शना मारा. कारण प्रत्येकाच्या हृदयात आत्मा असतो, असेही डॉ. गुरूबा म्हणाले.
कथेनंतर सुवर्ण व्यापारी मुरारी शेठ, हॉटेल व्यावसायिक विजय चौधरी, प्रशांत चौधरी,डॉ. बाविस्कर, डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
तरुण कुढापा मंडळातर्फे आयोजित कथेला दिनांक २५ रोजी सुरुवात झाली. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथा होत आहे. संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या चौथ्या दिवशी २८ रोजी श्रीकृष्ण जन्मउत्सव, २९ रोजी दहीहंडी उत्सव, ३० रोजी विवाह सोहळा, ३१ डिसेंबरला सुदामा चरित्र होणार असून संध्याकाळी कथेची सांगता होऊन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळ काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.