अमळनेर तालुक्यात करणखेडा येथे शनिवारी घडली होती घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील करणखेडा गावात दि. २६ एप्रिल रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २७ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मारवड पोलीस ठाण्यात सोमवारी २८ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश बारीकराव पाटील (वय ४५, रा. करणखेडा, सध्या मुक्काम विनायक नगर, सुरत, गुजरात) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याबाबत पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. महेश पाटील हे आपल्या कुटुंबासह सुरत येथे वास्तव्यास होते. करणखेडा शिवारात त्यांची शेती असल्याने, ते २५० एप्रिल रोजी सुरतवरून शेती नांगरण्यासाठी गावी आले होते.(केसीएन)दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता ते जळालेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील काही नागरिकांनी त्यांना तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. महेश पाटील हे कोणत्या कारणामुळे जळाले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मारवड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पुढील चौकशी करीत आहेत.