चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव येथील एक ३२ वर्षीय तरुण विहिरीत पडून मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ प्रकाश पाटील (वय ३२, रा. आडगाव, ता. चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमनाथ हे विहिरीत पडल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक सुनील पितांबर पाटील यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमनाथ पाटील यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाकडून लेखी मेमोद्वारे पोलिसांना देण्यात आली. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सोमनाथ पाटील यांचा विहिरीत पाय घसरून अपघात झाला की अन्य काही कारणाने ते विहिरीत पडले, याचा तपास पोलीस करत आहेत.









