जळगाव महापालिका निवडणूक ; अपक्ष उमेदवारावर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतरही विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून आचारसंहितेचे म्हणावे तसे पालन होताना दिसत नाही. अशाच एका अपक्ष उमेदवारावर जळगावात पहिला गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिका निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आदर्श आचारसंहितेची नैतिक नियमावली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नागरिकांचा शांततेचा अधिकार अबाधित ठेवणे तसेच सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे, हा आदर्श आचारसंहितेचा प्रमुख उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. जळगाव शहरातही निवडणूक आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मात्र, तरीही आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिंधू कोल्हे यांनीही याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच सुनील पाटील यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार, कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विना परवानगी प्रचार फलक लावल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक ११ ड मधील अपक्ष उमेदवार सुनील ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई यंदाच्या महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा ठरला आहे. महानगरपालिकेचे पथक शहरात विना परवानगी आणि शहर विद्रुपीकरण करणाऱ्या बॅनरची पाहणी करीत असताना, गिरणा पंपिंग रस्त्यावर उतारावर अपक्ष उमेदवार सुनील ज्ञानेश्वर पाटील यांच्या नावाचे व चिन्हाचे विना परवानगी बॅनर दिसले. या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी वसंत पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुनील पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी बॅनर जप्त केले.









