चोपड्यात एसीबीची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने एका मोठ्या सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (वय ३५) याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार चोपडा शहरात घडला असून, संशयित आरोपी अमित दिलीप सुलक्षणे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्षा 2 मध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने एका २३ वर्षीय तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसवण्यासाठी ५,५०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४,५०० रुपये ठरवण्यात आले. बुधवारी त्याला ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, १२ मार्च रोजी सापळा रचून संशयित आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाई जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे आणि पो. ना. राकेश दुसाने यांचा समावेश होता.