अमळनेर प्रतिनिधी: ;- राज्यात दिवसेंदिवस कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक जणांचे बळी जाताहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने दि.३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे तसेच शाळा,महाविद्यालय देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.असे असताना एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती इंद्रा मालो यांनी दि.१ जुलै पासून अंगणवाडी केंद्र सुरू करून अंगणवाडी सेविकांनी ग्रोथ मॉनिटरींचे काम करावे असा आदेश काढला आहे.
सदर आदेशानुसार अंगणवाडी सेविकांनी केंद्र उघडून रोज पाच लाभार्थींना बोलवून त्यांची उंची व वजन घेऊन ते कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअर भरावे.उंची वजन घेतांना सामाजिक अंतराचा नियम पाळावा तसेच उंची वजन घेतल्यानंतर वजनकाटासह इतर साहित्य सँनिटराईज करावे.असे आदेशात नमुद केले आहे.
राज्यात खेडोपाडी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असत रुग्ण संख्या हि दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. म्हणून पालकांची आपल्या मुलांना अंगणवाडी केंद्रात पाठविण्याची मानसिकता नसून विरोध करीत आहेत.परिणामी अंगणवाडी सेविकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून कामकाज अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
प्रत्येक बालकांच्या उंची वजन घेतल्यानंतर वजनकाटा व इतर साहित्य सँनिटराईज करण्यासाठी रोज १०० ते २०० मिलीमीटर सँनिटायझर लागण्याची शक्यता आहे.शासनाने अंगणवाडी स्तरावर सँनिटायझर उपलब्ध करून दिलेली नाही.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आर्थिक द्रुष्ट्या ते परवडणारे नाही.
अंगणवाडी केंद्रात येणारे लाभार्थी हे ० वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील आहेत.त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शाळा,महाविद्यालयांच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याबाबत फेरविचार करून आयुक्तांनी काढलेला आदेश मागे घ्यावा.अशी मागणी संघटनेने मा.मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली असल्याचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.