जळगाव ;- गेल्या दीड -दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लोकडाऊन असल्याने मद्यप्रेमींची गोची झाली होती . मात्र आता मद्य विक्रीची दुकाने उद्या ५ मे पासून खुली होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला आहे .
लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात जिल्ह्यात नेमके काय सुरू होणार ? याबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, आयुक्ती सतीश कुलकर्णी, सिव्हील सर्जन चव्हाण आदी उपस्थित होते.
आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीची दुकाने सुरू झाली असली तरी जिल्ह्यात १७ मे पर्यंत दारूची दुकाने बंद असतील असे नोटिफिकेशन जिल्हा प्रशासनाने काढले होते. या पार्श्वभूमिवर, आजच्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील दारू दुकाने ही मंगळवार दिनांक ५ मे पासून सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकार्यांनी केली. यात फक्त वाईन शॉप्स सुरू होणार असून संबंधीत दुकानदाराला सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याची अट टाकण्यात आलेली आहे. तर, जिल्ह्यातील परमीट रूम, बियर बार आदींना मात्र परवानगी नाकारण्यात आलेली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गॅरेज व स्पेअरपार्ट विक्रीची दुकाने देखील सुरू होणार आहेत. शेतकरी आपला माल आधीप्रमाणे कुठेही विकू शकतात अशी माहिती याप्रसंगी देण्यात आले.