नारायणगाव(वृत्तसंस्था) -नारायणगाव परिसरातील आनंदवाडी (वारूळवाडी, ता. जुन्नर) येथे शेत जमिनीच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाने 22 वर्षीय भावाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी 3. 40 वाजण्याच्या सुमारास घडली. नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
महेश धनराज भुजबळ (वय 22) असे खून झालेल्याचे नाव आहे. अमोल बाळकृष्ण भुजबळ असे फरार असलेल्याचे नाव आहे. तर धनराज चिमाजी भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनराज भुजबळ व बाळकृष्ण भुजबळ हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर अमोल भुजबळ सख्खा चुलत भाऊ आहे.
दरम्यान, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गव्हाळी मळा येथील शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसंत भुजबळ यांनी खांब लावलेला आहे. या खांब लावल्याच्या कारणावरून धनराज भुजबळ व अमोल भुजबळ यांच्यामध्ये मंगळवारी दुपारी 1 वाजता शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी अमोलने मीच बघतो काय करायचे असे बोलून रागारागाने निघून गेला होता. त्यानंतर धनराज हे आतल्या खोलीत त्यांचे काम करीत होते.
तेवढ्यात दुपारी 3.40 वाजण्याच्या सुमारास मोठ्याने आवाज आल्याने धनराज बाहेर आले. त्यावेळी अमोल याने महेशच्या मानेवर दोन्ही बाजूला कुऱ्हाडीने सपासप वार केल्याने तो रक्तच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर अमोलने धनराज यांच्यावरसुद्धा हल्ला करणार होता; मात्र सुदैवाने ते बचावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.