बैतुल जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चाळीसगाव;– तालुक्यातील ऊसतोड कामगार व मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशात स्थलांतरित झालेला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे राजेगाव, ता.खजरी, जि.बैतुल येथील कारखानदारांनी त्या मजुरांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याने जवळपास ९०० हुन अधिक कामगारांचे हाल होत होते. लोणजे येथील ऊसतोड कामगारांचे मुकादम अजय पाटील व चाळीसगाव येथील दीपक पाटील यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली असता भाजपा शहर सरचिटणीस योगेश खंडेलवाल यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी मध्यप्रदेश येथील त्यांचे स्थानिक मित्र यांना संपर्क साधला.
आणि काल दि.६ एप्रिल रोजी रात्री आमदार मंगेश चव्हाण यांच्या इंदोर येथील मित्रांनी अन्न धान्य, मीठ मिरची, मसाला, पीठ, तांदूळ आणि आज सकाळी भाजीपाला पोहचवला. अश्या अडचणीच्या वेळेस मंगेशदादा आणी त्यांचे मित्र देवदूता सारखे मदतीला आले अशी भावना फोनवरून त्या ऊसतोड मजुरांनी व्यक्त केली.
चाळीसगाव तालुक्यातील कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही हा प्रण घेतलेल्या आमदार चव्हाण हे इतर राज्यात अडकलेल्या चाळीसगाववासीयांच्या मदतीला धावून जात आपला शब्द पाळत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.