साडेचौदा लाखांची रोकड घेऊन तीन चोरट्यांचे पलायन
जळगाव ;- गॅस कटरच्या साहाय्याने तीन चोरटयांनी शहरातील शिव कॉलनी येथील एटीएम फोडून तब्बल साडेचौदा लाख चोरून नेल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेनंतर पोलिसांनी अर्ध्यातासानंतर घटनास्थळी धाव घेतली . सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन जण कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशी योगेश शिवाजी जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती बँक शाखा व्यवस्थापक दिवेश अर्जून चौधरी यांना दिली. त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
प्राथमिक तपासणीमध्ये संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या एटीएममध्ये अजून सात लाख रूपयांची रोकड असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री १ वाजून ५५ मिनीटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे २ वाजून ३३ मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याचे समजते.
या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँकेतील सीसीटिव्हीची मदतीने पोलिसांचा तपास सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरू असतांना पहिल्यांदा काही दिवस गुन्हेगार निवांत होते. मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आढळून आले असून यामुळे पोलिसांनी चोरटयांनी पोलिसांना जणू आव्हान दिले आहे.