फैजपूर, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर वाईन शॉप्सवर तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसत आहेत. फैजपूरात सर्व नियम पायदळी तुडवून मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यामुळे ‘कोरोना’ आटोक्यात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न वाया जाण्याची भीती आहे.
फैजपूरातील सुभाष चौक जवळील जैस्वाल ब्रॅंडी हाऊस व भुसावळ रोड जवळील सोसायटी वाईन या दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. काही जणांनी मास्क लावले होते, मात्र अक्षरशः एकमेकांना चिकटून उभे राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र इथे सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहेत. मात्र, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रचंड मेहनत घेत आहेत. दरम्यान, सरकारने आता मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे.