नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले. त्यानंतर आता या चकमकीसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल
प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
प्रियंका गांधी काँग्रेसच्या सरचिटणीस असून त्यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी आहे. मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्दांवरुन योगी सरकारला घेरले आहे.
गुरुवारी विकास दुबेला मध्यप्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. ‘कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला’ असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.







