तेल अवीव ;- एकीकडे सगळे जग कोरोनारूपी संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे आता या संकटात जगासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळं कोरोनावर मात करणाऱ्या इस्रायलच्या या लढ्याकडे सारं जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.

इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतर या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. त्यामुळेच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही इथे कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.







