जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील सागर पार्क मैदानाजवळ एका २४ वर्षीय तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हातातून हिसकावून पळ काढल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शुभम दिलीप भिरुड वय 24 रा शिवराम नगर हा तरूण शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील सागरपार्क मैदानाजवळ बॅरिस्टर निकम चौकाकडून रामदास कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावर वडील दिलीप श्रावण भिरुड व आई निता, भाऊ रुपेश या कुटुंबियासमवेत बॅरिस्टर निकम चौक ते रामदास कॉलनी रस्त्यावर शतपावली करीत होता. बॅरिस्टर निकम चौकात चालत असतांना, शुभमला त्याचा मावस भाऊ हर्षद याचा फोन आला आला. त्याच्याशी मोबाईलवर बोलत असतांना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कानाला लावलेला मोबाईल हिसकावून नेला व रामदास कॉलनीकडे दोघे पसार झाले. शुभमसह त्याच्या भावाने दोघांचा पाठलाग केला मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी शुभम भिरुड याने तत्काळ रामानंद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.







