मुंबई (वृत्तसंस्था ) ;- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टिकेला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका करून उत्तर दिलं असून त्यांच्या टिकेची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यभरातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काढलेल्या दौऱ्यातून सरकारवर कोरोनाची खरी माहिती लपवल्याचे आरोप केले होते. तसेच, राज्यातल्या काही प्रमुख ठिकाणी भेटी देऊन तिथे कोरोनावर उपाययोजनांमध्ये सरकार कसं कमी पडत आहे, याचे दाखले पत्रकार परिषदा घेऊन दिले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी (त्यांच्यावर निशाणा साधला होता.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘कोरोनाच्या या संकटकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातली मंडळी राज्यभर फिरत आहेत आणि सरकारवर टीका करत आहेत. आपत्ती पर्यटन अर्थात डिझास्टर टुरिझम करत आहेत’.
‘त्यांच्या टीकेवर मला प्रतिक्रियाही द्यायची नाही’
दरम्यान, या टिकेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांना आज पत्रकारांनी विचारणा केली असता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेची खिल्ली उडवली. ‘नया है वह. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात, त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनले, म्हणजे शहाणपणा येतोच असं नाही. माझ्यासारख्या माणसानं त्यांच्या या टिकेवर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.