जळगाव (प्रतिनिधी)-मध्य प्रदेशातील उमर्टी, ता.वरला येथून गावठी पिस्तुल घेऊन आलेल्या गोविंद संजय जाधव (20, रा.अरुण नगर, चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री साडे नऊ वाजता चोपडा-शिरपुर रस्त्यावरील हॉटेल तृप्ती साईजवळ पकडले. उमर्टी येथून एक तरुण गावठी पिस्तुल व काडतूस घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. त्यामुळे रोहोम यांनी हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने व प्रवीण हिवराळे यांना रवाना केले होते. या पथकाने चोपडा-शिरपुरजवळ सापळा रचला. तेथे गोविंद याला पकडण्यात आले. त्याच्याजवळून 18 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले. या पिस्तुलवर ङ्गमेड इन युएसएफ असे नाव आहे. उमर्टी येथील सिकलकर (सरदार) याच्याकडून विकत आणल्याची माहिती गोविंद याने पोलिसांना दिली. मनोज दुसाने याच्या फिर्यादीवरुन गोविंद जाधव याच्याविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला आर्मअॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.