जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने गर्दी होत असल्याने आता शेवटी पेट्रोल पंपावर निर्बंध घालण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डीझेल उपलब्ध असणार आहे. त्यासाठीची वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहराच्या तीन किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल-डीझेल पंप ३१ मार्चपर्यंत सकाळी ७ ते १० आणि दुपारी ४ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
यांना मिळणार पेट्रोल-डीझेल
सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, कर्तव्यावर असलेली वाहने, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी वाहने, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टर आणि नर्सेस, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, प्रसार माध्यमांची वाहने व प्रतिनिधींची वाहने, वृत्तपत्र विक्रेते व वितरणाशी संबंधित यंत्रणा, गणवेशधारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, घंटागाड्या, पाणीपुरवठा करणारी वाहने, एनजीओ, अन्न-भाजीपाला, फळे, दुध पुरवठा करणारी वाहने यांनाच पेट्रोल-डीझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट्रोलपंप चालकांना विक्रीची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.