टोरांटो ( वृत्तसंस्था ) ;- पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी जीवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात. निसर्गत: पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आपल्याला माहितीच आहे. मात्र पाण्यालाही वय असते का? असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना. पण ही बातमी वाचून तुम्ही नक्की विचार करू लागाल. कारण संशोधकांनी पृथ्वीवरील सर्वात जुने पाणी शोधले आहे.

टोरंटो विद्यापीठाचे भू-रसायनशास्त्रज्ञ बारबरा शेरवुड लोलर यांच्या पथकाने पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाण्याचा शोध लावला आहे. बारबरा यांनी आपल्या पथकातील दोन सदस्यांच्या मदतीने कॅनडाच्या ओंटारिया जवळील टिमिंस नावाच्या भागात असणाऱ्या खाणीमधील हे पाणी जमा केले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये तपासणीसाठी पाठवले. अनेक दिवस झाले तरी विद्यापीठाकडून कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी फोन करून चौकशी केली.
बारबरा यांनी तपासणीसाठी पाठवलेल्या सँपलचे काय झाले? असे विचारले. यावेळी लॅबमध्ये उपस्थित कर्मचाऱ्याने तपासणी करणारे यंत्र (मास स्पेक्ट्रोमीटर) तुटल्याचे सांगितले. तसेच हे पाणी अपेक्षेपेक्षा खूपच जुने असल्याचेही म्हटले. तपासणीमध्ये हे पाणी तब्बल 160 कोटी वर्ष जुने असल्याचे समोर आले. पृथ्वीवरील हे सर्वात जुने पाणी असल्याचे ऐकूण बारबरा यांना आपल्या कानावर विश्वास बसला नाही.
बारबरा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या पाण्याला एक विशिष्ट वास येत होता. तसेच याची चव समुद्रातील पाण्यापेक्षा 10 पट खारट आहे. या पाण्यामुळे सौरमंडळात अन्य ग्रहांवर जीवन होते अथवा नाही याचा तपास लावता येऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बारबरा यांनी शोधलेल्या 160 कोटी वर्षांपूर्वीच्या पाण्याचा रंग पिवळसर असून या पाण्यामध्ये इंजीनियम नावाचे तत्व आढळले आहे. सध्या हे पाणी ओटावाच्या कॅनडा सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्यूजीयममध्ये ठेवण्यात आले आहे.
1963 ला सुरु झाली होती खाण
दरम्यान, ही खाण 1963 ला सुरु झाली होती. या खाणीमधून तांबे आणि झिंक काढले जाते. 3 किलोमीटर खोल असणाऱ्या या खाणीत उतरण्यासाठी जवळपास 1 तास लागतो. सध्या ही खाण जगभरातील संशोधकांसाठी प्रयोगशाळाच झाली असून अनेक संशोधक येथे रिसर्चसाठी येतात.







