जळगाव – मद्य व्यवसायात भागीदार असल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाल्याने एमआयडीसी पोलीस निरीक्षकांसह ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता असून कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे विश्व्सनीय सूत्रांनी सांगितले.
फोन संभाषण, व्हॉटस्अॅप चाटींग तसेच आर.के.वाईन्स संबधित मालक यांच्या जबाबावरुन पोलीस निरिक्षक रजणीत शिरसाठ यांची आर.के.वाईन्समध्ये भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले. आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द झाला असून आता कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
एसआयटीच्या तपासात आर.के.वाईन्स प्रकरणात रणजीत शिरसाठ, पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने गुरुवारी पाचही जणांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
आर.के.वाईन्स प्रकरणात फोन संभाषण, व्हॉटस्अॅप चॅट या व्दारे प्रत्येकाचा नेमका काय सहभाग याबाबतही एसआयटीने सखोल चौकशी केली. यात मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव हे अवैध मद्याची वाहने कारवाईपासून वाचविण्यासाठी तसेच सोडण्यासाठी सहकार्य करत असल्याचे समोर आले. चौकशीत मनोज सुरवाडे याची शहरातील एका हॉटेलातही भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आर.के.वाईन्स प्रकरणात सहभागानुसार आरोपी करण्यात आलेल्या सर्वांवर निलंबनाची कारवाई निश्चित आहे. यात पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, मनोज सुरवाडे, जीवन पाटील, संजय जाधव या चौघांवर निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचाही प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक यांची मुख्यालयात जमा करण्यात आले असून त्यांचा पदभार पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे देण्यातआला आहे. शिरसाठ यांच्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर नव्या पोलीस निरिक्षकाची नियुक्ती होणार असल्याचे समजते .