नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधीच कोलकात्यामधील डमडम मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाच्या भितीमुळे चक्क हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तुरुंगातील कैद्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली. संतापलेल्या कैद्याने एका छोट्या कार्यालय वजा चौकीला आग लावली. कैद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्याचा मारा करावा लागला. तुरुंगामध्ये झालेल्या या हाणामारीमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीत १२ हून अधिक कैदी गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांवर आणि तपासणीमुळे कैदी वैतागल्याचे तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे न्यायालयातील खटल्यांची सुनावणी लांबवणीवर पडणार असून त्यामुळे त्यांना कुटुंबियांना भेटता येणार नाही असा कैद्यांचा समज झाला. कोरोना पसरु नये म्हणून आम्हाला मास्क देण्यात यावे आणि तुरुंगाची अधिक चांगल्या पद्धतीने साफसफाई केली जावी अशी मागणीही कैद्यांनी केली. डमडम तुरुंगामध्ये सध्या अडीच हजार कैदी आहेत.