नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट खूप घातक ठरली. देशात आतापर्यत 2.83. कोटी जणांना कोरोनाची लागण झालेली आहे तर 3.35 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आढळणारा कोरोना व्हेरियंट म्हणजेच डेल्टा व्हेरियंटमध्ये तीन स्ट्रेनअसल्याचे समोर आले आहे. पण देशातील आढळणाऱ्या या तीन स्ट्रेनमध्ये फक्त एकच स्ट्रेन घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेसांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या बातमीमुळे अनेकांना दिलासा वाटला आहे.
भारतात सर्वात आधी आढळून आलेल्या कोरोना व्हेरियंट म्हणजेच डेल्टा व्हेरियंटचा केवळ एक स्ट्रेन चिंतेचा विषय आहे. इतर दोन स्ट्रेन अधिक घातक नसल्याचे संघटनेने सांगितले आहे. कोरोनाच्या या व्हेरियंटला B.1.617 या नावाने ओळखले जाते. याच व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार इतका भयंकर झाल्याचे पाहायला मिळाले. हा ट्रिपल म्यूटेंट व्हेरियंट आहे, कारण याच्या तीन प्रजाती आहेत.मागील महिन्यातच WHO ने कोरोनाचा हा व्हेरियंट ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ म्हणजेच चिंता वाढवणारा व्हेरियंट असल्याचे म्हटले होते. यावर भारत सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र, आरोग्य संघटनेने मंगळवारी असे म्हटले, की आता B.1.617 व्हेरियंटमधील केवळ एकच प्रजाती चिंतेचा विषय आहे. संघटनेच्या मते, B.1.617.2 व्हेरियंटचा धोका कायम आहे, तर इतर दोन व्हेरियंटचा धोका कमी झाला आहे.
कोरोनाचा B.1.617.2 व्हेरियंट अजूनही चिंतेचा विषय आहे. याशिवाय विषाणूचे इतर तीन व्हेरियंटही मूळ संक्रमणाच्या तुलनेत अधिक घातक मानले जात आहेत. कारण ते अधिक वेगाने पसरणारे आणि घातक आहेत. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने भारतात पहिल्यांदा आढळलेल्या बी.1.617.1 आणि बी.1.617.2 ला क्रमशः ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ अशी नावे दिली आहेत. तीन आठवड्यांआधी काही माध्यमांनी बी.1.617 या कोरोना व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट असे म्हटले होते. यावर भारत सरकारने आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीर जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरियंटला देशाच्या नावाने न संबोधता संघटनेकडून दिलेल्या नावांनुसार त्याचा उच्चार करण्यास सांगितलं.