पुणे ;- | कोरोनाने अनेक लोकप्रतिनिधींना ग्रासलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जुन्नरचे नगरसेवक दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे.

पुण्यातल्या एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दिनेश दुबे हे जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासतले सहकारी म्हणून दुबे यांची ओळख होती. तसंच जुन्नरच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं.
दरम्यान, जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आम्ही आमचा जवळचा सहकारी गमावला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच संपूर्ण जुन्नरमध्ये त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.







