कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी थेट काळ्या नागिणीशी केली.
‘काळी नागिण (विषारी साप) चावल्यामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होतो, त्याच प्रकारे निर्मला सीतारमण यांच्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि सीतारमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्या इतिहासातील सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत’ अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली.
कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून खासदारकी मिळवली आहे. ते एक सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी तृणमूलसाठी असंख्य केसेस लढल्या आहेत
तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, ‘जूनमध्ये राज्यात बेरोजगारीचा दर 6.5 टक्के होता, जो देशाच्या तुलनेत ‘बराच चांगला’ आहे’ केंद्राद्वारे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा हवाला त्यांनी दिला होता. कोविड-19 संकट आणि अम्फान चक्रीवादळ यांचा सामना करण्यासाठी आपल्या सरकारने आखलेल्या आर्थिक रणनीतीमुळे हे साध्य झाल्याचा दावा त्यांनी केला होता.







