म्हसावद येथील घटना ; तिघांना अटक
जळगाव ;- तालुक्यातील म्हसावद येथील खडसेनगर परिसरातील घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना येथे १८ रोजी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली . या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे . यात लहान भावासह दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . दरम्यान घटनास्थळी डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन , एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे ,उप पोलीस निरीक्षक संदीप पाटील , सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी , हेमंत पाटील,दीपक चौधरी ,सचिन देशमुख ,चालक रवींद्र चौधरी आदींनी आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी केली .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की म्हसावद येथील जितेंद्र प्रकाश इंगळे (वय ३० )याला त्याचा लहान भाऊ संदीप प्रकाश इंगळे वय २५ याने घरगुती भांडणाच्या वादातून संतापात त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याचा खून केला. हि घटना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली . यावेळी समीर मंजूर पठाण , सद्दाम कालू मणियार या दोघांनी भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनी आरोपीला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. मयत जितेंद्र याला जखमी अवस्थेत रात्री ९ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले . मात्र तो मयत असल्याने पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास आरोपी संदीप इंगळे याने म्हसावद येथे मयताचा मृतदेह आणून आज सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्याचा त्याचा प्रयत्न होता . मात्र हा प्रकार एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने हाणून पाडला . दरम्यान तिघांना कॉन्स्टेबल समाधान पाटील पोलीस नाईक स्वप्नील पाटील , हेड कॉन्सटेबल बळीराम सपकाळे , पोलीस नाईक शिवदास चौधरी, पोलीस नाईक शशिकांत पाटील, यांनी अटक केली आहे . याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
धाब्यावरून पडल्याने भावाचा बनाव
मयत जितेंद्र इंगळे हा घराच्या धाब्यावरून पडल्याने तो जबर जखमी झाल्याने त्याला आपण उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात नेले असल्याचा बनाव आरोपी लहान भाऊ संदीप इंगळे याने पोलिसांकडे केला आहे . मात्र त्याच्या लाकडी दांडक्याने डोक्यात वार केल्याने यात तो जबर जखमी झाला होता . यातच तो गतप्राण झाला . मात्र पोलिसांनी हि माहिती काढून दोघा भावांचे जोरदार भांडण होऊन याचे पर्यावसन खुनाच्या रूपात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. दरम्यान मयताच्या पश्चात एक भाऊ आणि आई असा परिवार आहे .