जळगाव ;- महापालिकेतून सुभाष गणपत सोनार हे १ मे २०१८ रोजी वाहनचालक पदावरून निवृत्त झाले. महापालिकेत वाहनचालक पदावरून निवृत्त होऊन २४ महिने उलटूनही मला अद्यापही पेन्शन न मिळाल्याची आपबिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितली.
मनपात १ मे २०१८ रोजी निवृत्त झाल्यानंतर १०० टक्के पेन्शन मिळण्यासाठी मी मनपाच्या पायऱ्या झिजवत होतो. मात्र, कोणाकडूनच सहकार्य मिळाले नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटल्यावर त्यांनी मला अास्थापना अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे पाठवले. मात्र, मी पालकमंत्र्यांना भेटण्याचा त्यांना राग येऊन मी आहे तोवर पेन्शनचा पैसा भेटू देणार नाही, असे सांगत १२ मे २०२०चे परिपत्रक माझ्या अंगावर भिरकावत तुला जायचे तेथे जा असे सांगितले. माझी आई ९० वर्षांची असून, तिला वैद्यकीय खर्चाला पैसे लागत आहेत. पेन्शनसाठी विभागीय आयुक्त नाशिक, मुंबई यांच्याकडेदेखील दाद मागितली; मात्र उपयोग झाला नसल्याचे सोनार यांनी सांगितले.