पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर पोहचली आहे. मुंबईतही कोरोनाचे काही नवीन रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढले आहेत. ‘या विषाणूचा आजार आणि प्रसार खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या थेंबामधून बाहेर पडत असतात. खोकल्यातून आणि शिंकेतून बाहेर पडलेले थेंब हवेतील धुलीकणासोबत पृष्ठभागावर पडतात. हे थेंबातील विषाणू थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहतात मात्र जास्त तापमान असलेल्या वातावरणात हे थेंब लवकर सुकतात. त्यामुळे रोग प्रतिबंध होतो. असेही या पत्रकात म्हंटले आहे.
त्या दृष्टीने वातानुकुलीत यंत्रणांचा कमीतकमी वापर, दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून जास्तीत जास्त हवा खेळती राहणे हा देखील या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.त्याचप्रमाणे श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क आल्यास संसर्ग टाळण्यासाठीही खबरदारी घेणे, खोकताना, शिंकताना नाकातोंदावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, हार वारंवार धुणे, अर्धवट शिजलेले कच्चे मांस न खाणे, फळे भाज्या स्वच्ह धुवून खाणे, यादेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.