अमळनेर ;- गेल्या वर्षभरापासून शहरात मोकाट डुकरांचा उपद्रव वाढला आहे. या डुकरांनी शहराला लागून असलेल्या शेत शिवारात हैदोस घालून पिकांचे नुकसान केले. या डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी तहसील आवारात उपोषण केले. पालिकेने आठ दिवसांच्या आत डुकरांचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
ढेकू रोड, पिंपळे रोड, चोपडा, पारोळा, बहादरपूर रस्त्यावरील शेतांमध्ये डुकरांनी हैदोस घालून पिके फस्त केली. या डुकरांच्या बंदोबस्ताची जबाबदारी पालिकेची असल्याने त्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रभारी प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व माजी आमदार साहेबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात साहेबराव पाटील यांनी डुकरांच्या बंदोबस्तासाठी पालिका कठोर कारवाई करेल. मात्र, शासन आदेशानुसार मोकाट डुकरांचा नायनाट करण्याचा अधिकार शेतकऱ्यांसह सर्वांना आहे, असे सांगितले. यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलसमोर उपोषण सुरू केले. खासदार उन्मेष पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत समस्या सोडवण्यास सांगितले. यानंतर आठ दिवसात शहर वराहमुक्त करू, असे आश्वासन मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी दिले. यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. पं.स.चे माजी सभापती श्याम अहिरे, पुरुषोत्तम पाटील, अधिकार देसले, सुधाकर लांडगे, श्याम कदम, शिवाजी पाटील, एकनाथ चौधरी, शामराव देसले, भगवान देसले आदी उपस्थित होते.
——————————-








