नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट आता 48.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली
देशात आतापर्यंत 95 हजार 527 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 708 रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा 15 एप्रिल रोजी कोरोना रिकवरी रेट 11.42 टक्के होता, तो आता 48.07 टक्यांवर पोहोचला आहे, असं लव अग्रवाल म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टेस्टिंगची सुविधा वाढवण्यात आली आहे. देशात दररोज 1 लाख 20 हजारांपेक्षाही जास्ट टेस्ट होतात, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. देशात दररोज 7 ते 8 हजार कोरोना रुग्ण आढळतात. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 706 वर पोहोचली आहे. यापैकी 5 हजार 598 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार गेला आहे.
देशाचा कोरोना मृत्यूदर 2.82 टक्के
देशात कोरोना मृत्यूदर 2.82 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगभरातील इतर देशांच्या तुलनेने सर्वात कमी मृत्यूदर आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 73 टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब सारखे इतर आजारदेखील होते.
कोरोना रुग्णांच्या संख्येची तुलना इतर देशांसोबत करणे योग्य नाही. कारण इतर देशांच्या तुलनेने भारताची लोकसंख्या जास्त आहे. आपण तुलना केली तरी लोकसंख्येचा विचार नक्की करावा, असं लव अग्रवाल म्हणाले.
‘भारताची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या असलेल्या 14 देशांसोबत तुलना केली तर तेथील परिस्थितीत भारतापेक्षा भयानक आहे. त्या देशांमध्ये भारतापेक्षा 22.5 पटीने जास्त रुग्ण आहेत. तर 55.2 पटीने जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे’, असं लव अग्रवाल म्हणाले.