जळगाव- प्रतिनिधी- जिल्ह्यासह राज्यात वैद्यकीय सुरक्षिततेचा अभाव व प्रचंड धावपळीचा दबाव ; अशा विचित्र कात्रीत पोलिस खाते आता सापडलेले आहे. त्यामुळे आता जवळपास दोन महिन्यांनतर पोलिस खाते जणू कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्याने वेढले गेले असल्याचे समोर येते आहे. मुंबईसह ज्या ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या शहरांमध्येच पोलिसांचीही परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत असल्याने वास्तवात कोरोना योध्दे ठरलेले हे खाते या शत्रुपुढे हतबल ठरू नये म्हणून आता सरकारसह सामान्यांनीही भानावर येणे गरजेचे आहे. या संकटाशी मुकाबला कररणे फक्त सरकारी यंत्रणांचीच जबाबदारी आहे हा समज आता सोडून दिला गेला तरच लोक सहकार्य य स्वयंशिस्तीसाठी पुढाकार घेतील , अशी अपेक्षा पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत त्यांना याबाबतीत राजकारण्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
अगदी पंतप्रधानांनी एका दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले होते त्या दिवसापासून पोलिस खाते जणू कोरोेनाच्या दावणीला आपोआप बांधले गेल्यासारखे राज्यातले चित्र सर्वांसमोर आहे. या आजाराच्या साथीबद्दल सामान्य जनतेला बातम्यांमधून जेवढी चीनमधील परिस्थिती माहिती झालेली होती तेवढीच त्यांच्या आकलनात होती. दक्षतेसाठीची वेगळी जनजागृती महाराष्ट्रात झालेली नव्हती किंवा तशी शास्त्रशुध्द माहिती जनतेला व पोलिसांना देण्याचा वेळही लगेच लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे आरोग्य खात्याला मिळालेला नव्हता. अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांच्या स्थलांतरासह निर्माण झालेले अन्य सामाजिक प्रश्नही आपण पाहतो आहोत, त्यासाठी लोकभावनेच्या बळावर लढतो आहोतच. या लढण्यात मुख्यत: गर्दी टाळणे व शांततेसह अन्य समस्यांच्या निराकरणातही पोलिस खात्याला पुढेयावे लागले व ते आलेही. अशा सगळ्याच अनिश्चिततेच्या वातावरणात राब राब राबणारे पोलिस खातेही वैद्यकीय जागृती व दक्षतेच्या बाबतीत जागरूक नव्हते हे वास्तव होते. येथेच पोलिसांवर डाव साधायला कोरोनाने सुरूवात केली होती असेच म्हणावे लागेल.मजुरांच्या स्थलांतरामुळे व बाजारपेठांमधील तारांबळ हाताळताना येणार्या अडचणी पाहून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात पोलिस खात्याला युध्दपातळीवर काम मरावे लागले . लॉकडाऊनची शिस्त लोकांच्या अंगवळणी पडावी म्हणूनही सगळा भार पोलिसांवरच होता. म्हणजे कोरोनाचे संकट घोंघावत असताना तोफेच्या तोंडी असल्यासारखे आख्खे पोलिस खातेच लोकांच्या थेट संपर्कात आलेले होते. त्यातून त्यांना संसर्ग झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातच 2 पोलिस अधिकारी व 23 कर्मचारी कोरोनाचे रूग्ण ठरले आहेत. पुढच्या काळात या खात्याला कोरोनामुळे आणखी हतबलता येऊ नये म्हणून आता जनतेनेही दक्षतेच्याबाबतीत वेळकाढूपणा करून जमणार नाही. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या न्यायाने तरी लोकांनी प्रशासनाला व पोलिस खात्याला ताण देण्याची मानसिकता सोडावी हाच यावरचा प्रभावी उपाय ठरणार आहे.