चाळीसगाव ;- प्रत्येक मोठ्या बंदोबस्ता दरम्यान पोलिसांच्या भोजनाची व्यवस्था पोलीस व्यवस्थापनाकडून केली जाते,मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाउनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.याचे कारण म्हणजे भोजनातून कोरोनाचा विषाणूचा प्रसार होऊ नये किंवा बाहेरील अन्न खाल्ल्याने पोलीस आजारी पडू नये म्ह्णून लॉकडाऊन बंदोबस्तात जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
अशातच बाहेरगावाहून चाळीसगाव तालुक्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांकरिता येथील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने दररोज जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन च्या काळात माणूस लॉक आहे परंतु माणुसकी ची द्वारे सदैव खुली असल्याचे आपल्या विधायक उपक्रमातून सिद्ध केले आहे.
जिल्ह्यातील अनेक पोलिसांना घराबाहेर पडताना पोटाची व्यवस्था करण्यासाठी डबा घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे पोलिसांचे एकत्र जेवण तयार करणारा
आचारी किंवा त्याचे सहकारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले तर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन बंदोबस्तात पोलीस प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची एकत्र व्यवस्था केली नाही.
त्यातच लॉकडाऊन दरम्यान हॉटेल, उपहार गृह देखील बंद आहेत,परिणामी बाहेर जेवणाची व्यवस्था नसल्याने चाळीसगाव येथील लोकनायक स्वर्गीय तात्यासो महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाने सामाजिक जाणीवेतून बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांकरिता घरघुती जेवण उपलब्ध करून देत लॉकडाऊन च्या दरम्यान ‘माणुसकीचा घास’ उपलब्ध करून दिला आहे. मंडळाच्या या कार्यासाठी जयराज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अनुप परमार यांचे सहकार्य लाभत असून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,सहा.पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्याकडून मंडळाच्या या विधायक कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकरवाड,सहा पोलीस निरीक्षक मयूर भामरे हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील,अनिता शर्मा,धर्मराज बच्छे आदी उपस्थित होते.