मुंबई ;- जगभरासह भारतात कोरोना विषाणू रौद्र रूप धारण करतोय. अमेरिकेत तर कोरोनाने हैदोस घातलाय. कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धडकी भरवणारा इशारा दिला आहे.
कोरोनाचा प्रभाव आणखीही कमी झालेला नसताना काही देश टाळेबंदी उठवण्याच्या मनस्थितीत आहेत किंबहुना त्यांनी त्या पद्धतीने पावलं टाकायला सुरूवात केली आहे. त्यावरूनच कोरोनाची ही तर सुरूवात आहे खरा विनाश अजून तर दिसायचा आहे, असा इशाराजागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी दिला आहे.
जगभरात आतापर्यंत 24 लाख 82 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 70 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा परिस्थितीत कोरोना आणखी रौद्र रूप का धारण करेल याचं कारण टेड्रोस यांनी सांगितलेलं नाही.
अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय, असं म्हणत हा धोका आणखी गडद होईल, असं भाकित त्यांनी केलं आहे.