संत संमेलन, वस्ती-वस्तीत रांगोळी प्रदर्शन, मोटार सायकल रॅली व राष्ट्रमंदीर टॉक शो’चे आयोजन

जळगाव;- शहरातील जळगाव जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे 12 जानेवारी 2021 रोजी श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर प्रकाश टाकणार्या ‘राष्ट्रमंदीर टॉक शो‘चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात हा कार्यक्रम होईल. या ‘टॉक शो‘मध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ. यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को-ऑप. सहकारी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, तसेच डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते सहभागी होणार आहेत. जळगावातील सुपरिचित विधिज्ञ अॅड. सुशील अत्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या आस्थेचे प्रतीक असलेले श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्र मंदीर या संकल्पनेवर या ‘टॉक शो‘मध्ये मान्यवर प्रकाश टाकतील. अयोध्येत साकार होणार्या निधी समर्पण अभियानाची सुरुवात 15 जानेवारी पासून होणार असून एक महिना हे अभियान आपल्या जळगाव जिल्ह्यात होणार आहे. वस्ती, गाव, शहर,पातळीवर याचे नियोजन करण्याची कार्यकर्त्यांची योजना आहे. या अभियानाच्या प्रचार प्रसारसाठी बैठका संपन्न होत आहेत.
दि. 9 तारखेला पांजरपोळ संस्थान येथे संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारीला शहरातील विविध वस्तीत महिलांनी रामायणातील प्रसंगावर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन समितीने केेले आहे. तसेच स्वामी विवेकानंद जयंती युवादिनाच्या निमित्ताने दि. 12 जानेवारीला शिवतीर्थापासून मोटरसायकलीद्वारे रैली सुरु होणार असून समारोप आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात होईल. अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या अभियानाची माहिती होण्यासाठी जनजागरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अभियान प्रमुख देवेंद्र भावसार यांनी दिली. राष्ट्रमंदिरासाठी प्रेरणा जागविणार्या या कार्यक्रमास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे कळविण्यात आले आहे.







