मुंबई ;- भारतात कोरोना विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा यासाठी देशात टाळेबंदी जाहीर केली आहे. तसंच जाहीर कार्यक्रमांवर आणि धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी आणण्यात आली आहे. अशातच मुस्लिम बांधवांसाठी अतिशय पवित्र असणारा रमजानचा महिना जवळ आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलं आहे.
देशातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कोरोनाने अभूतपूर्व परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यामुळे रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज अदा केले पाहिजेत, असं आवाहन जावेद अख्तर यांनी केलं आहे.
कोरोनाला हरवायचं असेल तर आपण घरीच थांबावं. बांधवांनी घरातच नमाज अदा करावे तसंच रोजा देखील घरातच सोडावा, असं अख्तर म्हणाले आहेत. ते नेहमी विविध प्रसंगावर आपली भूमिका मांडत असतात. आताही पुढाकार घेऊन त्यांनी आपल्यावतीने मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे.