जळगाव – परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता महामार्गावर विद्यापीठासमोर घडली. या घटनेत दुचाकीवर मागे बसलेला दुचाकीस्वाराचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी महेंद्र रमेश पाटील (वय-३६) आणि प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०) हे दोन्ही चहा पावडर विक्रिचा गावोगावी जावून व्यवसाय करतात. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांभोरी येथे कामाच्या निमित्ताने दोघे दुचाकीने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या गेट समोरून जात असतांना परप्रांतियांना घेवून जाणाऱ्या आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात महेंद्र पाटील जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला.
अपघात होताच महामार्गावरील वाहनधारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रल्हाद पाटील याला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत महेंद्रचा मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
दरम्यान, आयशरने धडक दिल्याने एक ठार झाला आहे हे पाहून आयशरने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.