गुरुग्राम ( वृत्तसंस्था ) पायलट असलेल्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका एअर होस्टेसनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. २६ वर्षीय एअर होस्टेस आणि तिचा पायलट बॉयफ्रेंड यांच्यात पार्टी सुरू असतानाच कडाक्याचं भांडण झालं. दोघांमध्ये बाचाबाची झाली. ते बोलण्यासाठी बाल्कनीत आले. त्यानंतर रागानं एअर होस्टेसनं गुरुग्राममध्ये सेक्टर ६७मधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पीडितेच्या बहिणीनं तिच्या बॉयफ्रेंड विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत सेक्टर ६५ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा साधारण १२ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ सेक्टर ६७मधील बेस्टेक पार्क व्ह्यू स्पा नेक्स्ट सोसायटीत पोहोचले. मृत एअर होस्टेसचं नाव टेगला बुटिया असं असून, ती २६ वर्षांची होती. ती सिक्कीम येथील मूळ रहिवासी होती आणि डीएलएफ फेज ३ मध्ये राहत होती. ज्या फ्लॅटच्या बाल्कनीतून तिनं उडी मारली तो फ्लॅट भास्कर नावाच्या तरुणाचं आहे. भास्कर हा टेगलाचा मित्र डेझल थिकसे शर्मा याचाही मित्र आहे. घटना घडली त्यावेळी फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. अनेक तरुण या पार्टीत उपस्थित होते. डेझलनं या तरुणीला पार्टीला बोलावले होते.
फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. रात्री उशिरा ११ वाजता पार्टीतून जवळपास बरीच लोकं निघून गेली होती. मृत एअर होस्टेसचं नाव टेगला बुटिया, डेझल, भास्कर आणि अन्य काही तरुण फ्लॅटमध्ये होते. त्याचवेळी डेझल आणि या तरुणीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यांच्यात बाचाबाची झाली. ते दोघे बोलण्यासाठी बाल्कनीत आले. काही मिनिटांनी डेझल आतमध्ये गेला. टेगलानं खाली उडी मारल्याचं त्यानं सांगितलं. तिघेही खाली गेले. तिथे सुरक्षारक्षक आले होते. तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. माहिती मिळाल्यानंतर तिची बहीण बबयला बुटिया ही देखील तिथे आली. तिनं या प्रकरणी पोलिसांत डेझलविरोधात तक्रार दिली. डेझल आणि टेगला हे एकाच एअरलाइन्स कंपनीत नोकरी करत आहेत. टेगला ही एअर होस्टेस तर डेझल हा पायलट आहे. दोघेही काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. डेझल तिला त्रास द्यायचा. त्यानंच तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप बहिणीनं केला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.