अहंकार , महत्वाकांक्षा सोडून निष्ठेने उभे राहा ; कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी न देता मला फसवले , माझी समजूत काढली नाही असे म्हणणारे डी जी पाटील लबाडच आहेत , असे सांगत आमदार शिरीष चौधरी यांनी अहंकार , महत्वाकांक्षा सोडून निष्ठेने उभे राहा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर झालेल्या काँग्रेस भवनात पत्रपरिषदेत ते बोलत होते . आमदार शिरीष चौधरी पुढे म्हणाले की , वर्षभरापासून शेतकरी वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत हे कायदे मागे घेतले जाणार असले तरी संसदेत रद्द झाल्याशिवाय शेतकरी माघार घ्यायला तयार नाहीत . हाच विचार करून आम्ही सर्वपक्षीय पॅनलच्या प्रयत्नातून बाहेर पडलो . महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये काँग्रेसला ४ जागा मिळाल्या . यापैकी ३ जागा निवडून आल्या . चौथ्या जागेवर तांत्रिक कारणांमुळे माघार घ्यावी लागली . चोपड्याच्या उमेदवारावर अन्याय झाला . यानिमित्ताने बऱ्याच गोष्टी घडल्या . वर्षानुवर्षे पक्षाला खिळखिळी करणारी कीड काँग्रेस पक्षातच आहे हे समजले . मात्र सोनिया गांधी म्हणतात त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपला अहंकार आणि महत्वाकांक्षा सोडावी पक्षासाठी निष्ठेने काम करावे आता पक्ष प्रत्येक क्षेत्रात उभा करण्याची संधी आहे हे आम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत यश येणार नाही . फक्त सत्ता हे काँग्रेसचे ध्येय कधीच नव्हते आणि राहणारही नाही . लोकांच्या हितासाठी सत्ता हे आमचे ब्रीद आहे .
आमदार शिरीष चौधरी पुढे म्हणाले की , काहीजण जिल्हा बँक निवडणुकीतील काही मुद्द्यांवर आम्ही जाब विचारू असे म्हणत आहेत , चालेल आम्हाला, आम्ही देउ त्यांना खुलासा , करुत त्यांच्याशी चर्चा , यावे त्यांनी . मात्र पक्षहिताशी गद्दारी थांबल्याशिवाय पक्षाचे भले होणार नाही . डी जी पाटील हे काही काँग्रेसमध्ये एकमेव नाहीत की ज्यांनी म्हणाल्याबरोबर त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे . काय आणि कसे झाले हे त्यांनाही माहिती आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने चर्चा करायला गेलो होतो , फक्त डी जी पाटलांसाठी चर्चा करायला गेलो नव्हतो . मला फसवले असे डी जी पाटील यांचे म्हणणे म्हणजे लबाडी आहे , असेही ते म्हणाले .