विश्लेषण : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश दामू भोळे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांना यंदा शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन या लढत देत असून निवडणुकीत विजय कोणाचा यावर मतदारसंघात रोज खल होत आहे.
यंदा आ. सुरेश दामू भोळे हे हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीचे पदाधिकारी हे जोमाने त्यांच्यासाठी कामाला लागलेले दिसून आले आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन यांनीही प्रचारामध्ये जोर लावून प्रभावी लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील पंचवार्षिकला २०१९ साली आ. सुरेश भोळे यांना १ लाख १३ हजार ३१० मते तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांना ४८ हजार ४६४ एवढी मते मिळाली होती. यंदा अभिषेक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असून त्यांनी आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांच्यासोबत प्रचारांमध्ये सहभाग घेतला होता.जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात ४ लाख ३३ हजार ४६७ मतदार असून यात पुरुष २ लाख २३ हजार ७६८ तर महिला मतदार २ लाख ९ हजार ६६५ आहेत.
सर्वाधिक मतदार या मतदारसंघात दिसून येतात. तृतीयपंथी मतदार ३४ असून मतदारसंघात एमआयडीसी, रोजगार, शहरातील मूलभूत सुविधा आदि मुद्दे प्रचारामध्ये चर्चिले गेले आहेत. मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्या प्रमुख उमेदवारांशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. अनुज पाटील, बंडखोर अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे, कुलभूषण पाटील, संग्रामसिंह सूर्यवंशी हे देखील रिंगणात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २९ उमेदवार याच जळगाव शहर मतदार संघात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारांच्या संख्येबाबत एकच चर्चा ऐकायला मिळालेली आहे. बुधवारी मतदानाच्या दिवशी जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून आहे.