चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून बचत गटातील तसेच सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे. त्याकरीता येत्या तीन महिन्यात भव्यदिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.
चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बचत गट CRP तसेच VO सन्मान शक्तीवंदन अभियान व शिवनेरी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील सन 2018/19 मध्ये बोटावर मोजता येतील एवढेच बचत गट अस्तित्वात होते. आज सुमारे 3200 गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात 100 कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे. ही महिलाशक्तीची ताकद असून रुपयाला रुपया जोडत आपल्या संसाराचा गाढा महिला भगिनी ओढत आहेत, असेही आमदार चव्हाण म्हणाले.
बचत गट प्रभाग संघांसाठी इमारतीचे बांधकाम
चाळीसगाव तालुक्यात महिला बचत गटांच्या प्रभाग संघांसाठी मेहुणबारे व देवळी येथे प्रभाग संघ इमारत बांधकाम आमदार निधीतून सुरु झाले आहे. पुढील काळात बहाळ तसेच कळमडू, करगाव, टाकळी प्रचा, रांजणगाव पाटणा, वाघळी. पातोंडा, उंबरखेड, सायगाव या प्रभाग संघांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.