बोदवड पोलीस ठाण्यातील प्रकार
बोदवड ( प्रतिनिधी ) – बोदवड पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी शारदा चौधरी यांच्यावर फसवणूक आणि ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रस्तावित साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

जमीन खरेदी: २००२ मध्ये भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ उभारण्यासाठी काही जमिनींची खरेदी करण्यात आली होती. यामध्ये मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे यांच्या मालकीची ‘महार वतन’ जमिनीचा (गट क्र. १२२) समावेश होता.
आमिष व फसवणूक: जमीन खरेदी करताना तायडे कुटुंबाला योग्य मोबदला आणि कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ५१ हजार रुपये आगाऊ दिल्यानंतर उर्वरित रक्कम मिळाली नाही आणि आश्वासनही पाळले गेले नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दस्तावेजांत फेरफार: अनेक वर्षांनंतर, २०२५ मध्ये तायडे कुटुंबाला समजले की ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर नोंद झाली आहे. मूळ खरेदीखताची तपासणी केली असता, त्यात ‘तापी-पूर्णा शुगर’ या नावावर खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव लिहिल्याचे निदर्शनास आले.
चमेलाबाई तायडे यांनी याप्रकरणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एकनाथ खडसे, शारदा चौधरी, मध्यस्थ सुधाकर निनू पाटील आणि तत्कालीन दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी यांच्यावर बीएनएस आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









