एरंडोल, पारोळ्यात युतीचा नारा; उर्वरित ठिकाणी एकला चलो रे!
जळगाव( विशेष प्रतिनिधी ) – चाळीसगावचे आमदार आणि भाजपचे पश्चिम विभाग प्रमुख मंगेश चव्हाण यांनी आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचाराचा मोर्चा आक्रमकपणे उघडला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, एरंडोल आणि पारोळा येथे महायुती (भाजप-शिंदे गट) करून निवडणूक लढवली जाईल, तर पश्चिम विभागातील उर्वरित सर्व ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केला आहे.
आमदार चव्हाण यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण संचारले आहे. आपल्या प्रचार सभांमधून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत, मतदारसंघातील विकासाच्या मुद्यांवर जनतेशी थेट संवाद साधला. त्यांच्या सभांना ठिकठिकाणी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, भाजपच्या बाजूने सकारात्मक लाट निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

‘चॅलेंज’मुळे राजकीय वातावरण तापले
दरम्यान, अलीकडेच झालेल्या एका परिवर्तन मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना थेट आव्हान दिले होते. “चाळीसगाव पालिकेत जर तुम्ही एकतरी नगरसेवक निवडून आणला, तर आम्ही तुमचा सार्वजनिक सत्कार करू,” असे विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि प्रभारी संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण हे सध्या संपूर्ण पश्चिम मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ‘प्रत्येक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच!’ असा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांच्या प्रत्येक सभेत कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांचा वाढता सहभाग पाहता, येत्या स्थानिक निवडणुकांत पश्चिम विभागात भाजपसाठी अनुकूल वारे वाहू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.









