चाळीसगाव बस स्थानकात अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण
चाळीसगाव (प्रतिनिधी) :-आमदार मंगेश चव्हाण यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने चाळीसगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या बीएस-६ बसेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी अचानक एका भगिनीने गर्दीतून वाट काढत आ. मंगेश चव्हाण यांना लाडका भाऊ म्हणून साद घालत राखी बांधली. बहिणींच्या प्रेमाने आ. मंगेश चव्हाण भारावले.
बसस्थानकावर रक्षाबंधन सणासाठी माहेरी जाणाऱ्या महिलांची मोठी गर्दी होती. त्याच गर्दीतून एका महिलेने आमदार चव्हाण यांना पाहिले आणि ती धावत त्यांच्याजवळ आली.
त्या महिलेने चव्हाण यांना सांगितले की, “दादा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला राखी बांधायची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. पण आजपर्यंत कधी योग आला नाही. योगायोगाने आज तुम्ही मला इथे भेटलात. या बहिणीच्या हाताने तुम्ही ही राखी स्वीकारून घ्या.”बहिणीचे हे प्रेम पाहून आमदार चव्हाण भारावून गेले.
त्यांनी मोठ्या आनंदाने त्या महिलेकडून राखी बांधून घेतली आणि बसस्थानकातच अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी उपस्थित असलेले पदाधिकारी, एसटी कर्मचारी आणि प्रवासी हे सर्वजण कुतूहलाने हा क्षण पाहत होते. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, आ. मंगेश चव्हाण यांनी केवळ विकासकामांनाच नव्हे, तर माणुसकीच्या आणि नात्यांच्या बंधांनाही महत्त्व दिले, हे या प्रसंगातून दिसून आले.